५२९ झाडांसाठी पुणेकरांची मानवी साखळी; गणेशखिंड रस्त्यावर नागरिकांचा जोरदार विरोध
पुणे, दि. १ मे : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर नागरिकांनी एकत्र येत ५२९ झाडांच्या संरक्षणासाठी भव्य मानवी साखळी उभी केली. सिमला ऑफिस चौक ते पोलीस परेड ग्राउंड (कृषी महाविद्यालय चौक) या दरम्यान सायंकाळी झालेल्या या आंदोलनात सुमारे ३०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गणेशखिंड रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी रस्त्यालगत असलेली सुमारे २०० ते ३५० वर्षे जुनी वट व औदुंबर झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने मांडला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ नागरिकांनी “निसर्गाशी खेळ, भविष्याशी धोका” आणि “झाडे वाचवा, पुणे वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात विविध क्षेत्रातील आयटी अभियंते, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, योग शिक्षक तसेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा सहभाग होता. झाडांवर लावलेले क्रमांक आणि वृक्षतोडीच्या नोटिसा पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मेट्रोचे खांब अडथळा नाहीत, पण शेकडो वर्षांची झाडेच अडथळा कशी?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन ‘वृक्ष संवर्धन समिती, पुणे’च्या वतीने रुपेश केसेकर आणि समीर निकम यांनी केले. आंदोलनाची सांगता पोलीस ग्राउंडलगत असलेल्या नांद्रुक झाडाखाली करण्यात आली.
यावेळी ‘नागरिक वृक्ष संवर्धन समिती’ स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. शहरात वाढत्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर ही समिती निष्पक्षपणे काम करत झाडांच्या संरक्षणासाठी लक्ष ठेवणार असल्याचे समीर निकम यांनी सांगितले. तसेच, नागरिकांना वृक्ष संवर्धनासंदर्भातील कायद्यांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आज मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या नागरिकांचा आवाज पुणे महानगरपालिकेपर्यंत पोहोचेल आणि झाडे वाचवण्याचा निर्णय घेतला जाईल,” अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.