नोंदणी अधिकारी, एजंट-ठेकेदारांच्या जाळ्याचा पर्दाफाश; सोलापूरमधील घोटाळ्यानंतर पुण्यातही चौकशीची मागणी; दोषींवर गुन्हे दाखल करा; बांधकाम कामगार संघटनेची मागणी; बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणीत गैरव्यवहार?
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून अवघ्या चार वर्षांत नोंदणीकृत कामगारांची संख्या सुमारे २० हजारांवरून थेट सव्वालाखांहून अधिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वाढीमागे एजंट, काही ठराविक ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्रे तयार करून मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पैशांचे आमिष दाखवून अनधिकृत नोंदणी वाढवण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
पोलीस तपासात धक्कादायक बाबी उघडकीस येत असून, प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्राशी संबंध नसलेल्या व्यक्तींना देखील कामगार म्हणून नोंदवण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. यात शेतकरी तसेच इतर क्षेत्रांतील व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्तींच्या नावावरही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात आल्याचेही तपासातून निष्पन्न झाले आहे.
या पार्श्वभूमीवर बांधकाम मजूर संघटना आणि कामगार प्रतिनिधींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, एजंट आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सोलापूरप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याठिकाणीही नोंदणी प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कामगारांच्या नावावर असलेल्या कल्याणकारी योजनांचा गैरवापर थांबवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.