पुणे: ‘सर्वर डाऊन’चा बहाणा की नागरिकांना डाउन करण्याचा डाव? येरवडा ई-परिमंडळ कार्यालय पुन्हा चर्चेत
पुणे : येरवडा येथील ई-परिमंडळ कार्यालयात सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. कामासाठी आलेल्या नागरिकांना “सर्वर डाऊन आहे”, “नेट चालत नाही”, “जेवणाची वेळ झाली”, “आज वेळ संपली, उद्या या” अशा कारणांची मालिका ऐकावी लागते. मात्र याच वेळी एजंटांची कामे ‘सुरळीत’ आणि ‘वेगात’ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दुपारनंतर कार्यालय परिसरात एजंटांचा सुळसुळाट वाढतो आणि सामान्य नागरिक मात्र खुर्च्यांवर तासन्तास वाट पाहत बसतात, अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जाते. पाच मिनिटांचे काम करण्यासाठी एक ते दोन तास बसवून ठेवले जाते. काहींना “नेट बंद” तर काहींना “सर्वर डाऊन” अशी वेगवेगळी कारणे देण्यात येतात. खरोखरच तांत्रिक अडचण आहे की कामकाजातील ढिलाई लपवण्याचा प्रयत्न, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे मनमानी कारभाराला खतपाणी मिळाले आहे. “सामान्यांसाठी नियम, एजंटांसाठी सवलत” असा दुहेरी निकष राबवला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, अन्नधान्य वितरण व पुरवठा अधिकारी प्रशांत खताळ तसेच ई-परिमंडळ अधिकारी चांगदेव नागरगोजे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींसाठी “महाराष्ट्र माझा” न्युजशीही संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
नागरिकांचा सवाल मात्र कायम आहे — सर्वर खरोखरच डाऊन आहे की व्यवस्था? आता प्रशासन यावर ठोस भूमिका घेते की पुन्हा एकदा “उद्या या” म्हणत वेळ मारून नेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.