पिंपरी-चिंचवड एसीबीची मोठी कारवाई : 46 लाख 50 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात!
पुणे, दि. 2 नोव्हेंबर : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय 35) यांना तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रविवारी रंगेहात पकडले. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधान पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आरोपी उपनिरीक्षक चिंतामणी यांच्याकडे होता. त्यांनी तक्रारदाराच्या आशिल व त्याच्या वडिलांना मदत करण्यासाठी तसेच जामीन प्रक्रियेत सोयीस्कर भूमिका घेण्यासाठी 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने तत्काळ एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी करून सापळा रचला आणि रविवारी 46 लाख 50 हजार रुपयांची पहिली हप्त्याची रक्कम स्वीकारताना चिंतामणी यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणात चिंतामणी यांच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
या धक्कादायक कारवाईमुळे पोलीस यंत्रणेतील प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पुन्हा एकदा लाचखोरीच्या प्रकरणांनी पोलीस प्रतिमेला काळिमा फासला आहे.