पुणे: वाकडेवाडी परिसरात वाहतूक पोलिसांचा गोंधळ; नागरिकांचा सवाल – कारवाईऐवजी ‘हप्ता’ संस्कृती सुरूच का?
पुणे – वाकडेवाडी एसटी स्टँड परिसरात दररोज संध्याकाळी वाहतूककोंडीचे चित्र दिसत असून, ट्रॅफिक पोलिसांचा व ट्रॅफिक वॉर्डनचा अभाव जाणवतो. काही कर्मचारी परिसरात असले तरी ते चौकात कारवाई करण्याऐवजी जवळच्या दुकानदारांच्या ऑफिसमध्ये गप्पा मारत बसलेले दिसतात. परिणामी, रस्त्यांवर गोंधळ निर्माण होतो, वाहनचालक त्रस्त होतात आणि अपघातांच्या घटना घडतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शिवाजीनगर–वाकडेवाडी एसटी स्टँड चौकात दररोज सकाळ-संध्याकाळ मोठी गर्दी होत असते. सिग्नलवर तासन्तास थांबावे लागणारे वाहनचालक प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. या परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चारचाकी गाड्या बेकायदेशीरपणे पार्क केल्या जातात. एवढ्या स्पष्ट उल्लंघनानंतरही वाहतूक विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही, हे चित्र कायम आहे. उलट, काही अंतरावर चार–पाच कर्मचारी एकत्र येऊन सिग्नल सुरू असतानाच मधोमध कारवाई करताना दिसतात.
नागरिकांचा सवाल:
“हाकेच्या अंतरावरच ट्रॅफिक पोलीस स्टेशन असताना वाकडेवाडी परिसरात शिस्त का राखली जात नाही? एवढ्या प्रमाणावर नियमभंग होत असतानाही अधिकारी गप्प का आहेत? काही ‘हप्त्याचा’ व्यवहार तर सुरू नाही ना?” असा सवाल नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
‘तडजोड’ आणि ‘हप्ता’ संस्कृतीला चालना?
शहरात वाढत्या वाहनसंख्येसोबतच वाहतूक शिस्त मोडणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काही वाहतूक कर्मचाऱ्यांची ‘लालच’ नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे. दंड आकारणीऐवजी “तडजोड” आणि “हप्ता” संस्कृतीला चालना मिळाल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.
हेल्मेट नसणे, परवाना किंवा इन्शुरन्स संपणे, चुकीचे पार्किंग असे नियमभंग आढळल्यास काही कर्मचारी थेट रोख रक्कम स्वीकारून वाहनचालकांना सोडतात, असा प्रकार वारंवार दिसून येतो. त्याचबरोबर ट्रक, टेम्पो आणि मालवाहतूक वाहनांकडून नियमित ‘हफ्ते’ उकळल्याच्या चर्चाही शहरभर रंगल्या आहेत. नो-एंट्री झोनमध्ये या वाहनांना सहज प्रवेश मिळतो, त्यामागे “सेटिंग” असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे.
अनेक नागरिकांनी सांगितले की, “वाहतूक पोलीस नियम अंमलात आणण्यापेक्षा पैशांवर लक्ष केंद्रित करत आहेत. काही कर्मचारी तर पावत्यांमधील रकमेचा काही भाग स्वतःकडे ठेवतात.”
प्रशासन मौन; नागरिकांत संताप
वाहतूक विभागाकडून मात्र या सर्व आरोपांवर मौन बाळगण्यात आले आहे. पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव असल्याने नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि, स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की संबंधित ए.पी.आय. साहेब या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करतील.
—