मोठी बातमी! पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा

पुणे: पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. आयकर विभागाने मंगळवारी सकाळी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या घर व कार्यालयांवर एकाचवेळी धाड टाकून कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रोडवरील आयसीसी टॉवर येथील कार्यालयात तसेच सिंध सोसायटीतील निवासस्थानी आयकर विभागाने छापे घातले. याचबरोबर, मित्तल ग्रुपच्या बंडगार्डन परिसरातील कार्यालयावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
सध्या या छाप्यांमागचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसले तरी अचानक झालेल्या या हालचालीने बांधकाम क्षेत्रात व व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, मुंबईतील ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पाच्या चौकशीसंदर्भात ईडीने यापूर्वी मित्तल ब्रदर्स ग्रुपची चौकशी केली होती. महारेराच्या निर्देशानंतर ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. पॅलेस रॉयल प्रकल्पातील फ्लॅट्सच्या ताब्यात झालेल्या विलंबामुळे कंपनीवर सुमारे ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवरच ही अलीकडील कारवाई जोडली जात असल्याची चर्चा आहे.
पुण्यातील या धडक कारवाईने बांधकाम व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—