पुणे : जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये आधार केंद्र कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक; गैरवर्तन आणि वेळेआधी काम बंद केल्याने संताप – व्हिडिओ

0
IMG_20250626_224254.jpg

पुणे, २६ जून : पुणे रेल्वे स्टेशन येथील जीपीओ पोस्ट ऑफिसमधील आधार नोंदणी केंद्रात नागरिकांची पिळवणूक व मानसिक त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. २६ जून रोजी दुपारी चार वाजता अरबाज खान आणि त्यांची बहीण आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह गेले असता, त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावीच्या भाषेत वागणूक देण्यात आली.

लग्नानंतर नाव बदलण्यासाठी पॅन कार्ड, गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र पुरेसे असते. मात्र, संबंधित आधार केंद्र कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना थेट नकार दिला. याबाबत वरिष्ठ पोस्टमास्तर भोसले यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सूचनांचाही अवमान करत “आम्ही हे करणार नाही,” असा स्पष्ट नकार दिला.

पहा व्हिडिओ

नागरिकांनी विचारणा केली असता कोणताही शासकीय आदेश (जीआर) किंवा नियम दाखवण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उलट, “कोणाला कंप्लेंट करायची आहे तर करा, आम्ही घाबरत नाही,” असा उद्दामपणा त्यांनी दाखवला.

तसेच, दुपारनंतर काही ओळखीच्या व्यक्तींना आणि ई-सेवा केंद्र चालकांमार्फत आधार अपडेटची कामे केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळ सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असताना, आधार केंद्रातील ऑपरेटर चार वाजता काम थांबवत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी विचारणा केल्यानंतर, “आम्हाला हिशोब द्यावा लागतो, पाच नंतर कशाला करू,” असे उद्धट उत्तर दिले जाते.

या केंद्रात कोणतेही टोकन सिस्टम नसतानाही मनमानीपणे टोकन पद्धत राबवली जाते. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र लावणे बंधनकारक असतानाही बहुतेकजण ओळखपत्रांशिवाय ड्युटीवर काम करताना दिसतात. हे पाहता, पोस्टमास्तर यांचे नियंत्रण कर्मचार्‍यांवर नसल्याचे स्पष्ट होते.

या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जीपीओ पोस्ट विभागातील या शिस्तभंग आणि अनागोंदीस जबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकारी, यूआयडीएआय (UIDAI) आणि नॉर्थ डिव्हिजन पोस्ट ऑफिसकडे करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

You may have missed