पिंपरी चिंचवडमधील 36 बंगले केले जमीनदोस्त; रहिवाशांचे पालिका अधिकार्यांवर गंभीर आरोप – व्हिडिओ

पिंपरी – इंद्रायणी नदीपात्रालगत चिखली गावच्या हद्दीत असलेल्या गट क्रमांक 90 मधील घरांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिक्रमण म्हणत कारवाई केली. या कारवाईदरम्यान हवालदिल झालेल्या रहिवाशांनी महापालिका प्रशासनावर आणि संबंधित बिल्डरवर गंभीर आरोप केले. “जिथे महापालिकेने पाणी, लाईट, ड्रेनेजसारख्या सुविधा दिल्या, त्या भागात घरं तोडण्याची कारवाई का?” असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला.
रहिवासी झोन दाखवून फसवणूक?
सदर पाच एकर भूखंड रहिवासी झोनमध्ये दाखवून बिल्डरने नागरिकांकडून प्रति गुंठा 20 लाखांच्या दराने पैसे घेतले. काहींनी तर आयुष्याची जमापुंजी खर्च करून किंवा कर्ज काढून ही घरे बांधली होती. या व्यवहारामागे स्थानिक राजकीय नेत्यांचेही आशीर्वाद असल्याचा आरोप करत नागरिकांनी सांगितले की, विक्रीतून संबंधित बिल्डरने 20 ते 25 कोटी रुपये कमावले आहेत.
पहा व्हिडिओ
Link source: newdotz
कारवाईच्या वेळी पुढारी परागंदा
घरं पाडली जात असताना या नागरिकांची मदतीला कोणताही राजकीय नेता आला नाही. उलट, काहींचे फोन बंद आले, तर काही परागंदा झाल्याचे चित्र होते. त्यामुळे हतबल नागरिकांना डोळ्यासमोर आपली घरे उद्ध्वस्त होताना पाहावी लागली. “घर गेलं, आता कर्ज कसं फेडायचं?” असा व्यथित प्रश्न अनेक रहिवाशांनी उपस्थित केला.
महापालिकेवर पैशांच्या बदल्यात दुर्लक्ष केल्याचा आरोप
रहिवाशांनी सांगितले की, ‘शिरसाट’ नावाची एक व्यक्ती पन्नास हजार ते एक लाख रुपये घेत असे आणि बांधकामांना पाठींबा देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत हे पैसे जात होते. आता ही रक्कम नक्की कोणत्या अधिकाऱ्यांपर्यंत गेली याचा तपास व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. “फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई होणार का? आणि बांधकामांना दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?” असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
न्यायाची मागणी
रडत, हताश झालेल्या रहिवाशांनी आता शासनाकडे मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि आमची फसवणूक झालेल्या रकमेची भरपाई मिळावी.
या प्रकरणामुळे नियोजनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक कशी होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.