करोडोंचा खर्च, तरी जलपर्णी पावसानेच वाहून नेली; वारजेतील नदी स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
1003688754

वारजे, दि. ४ जुलै : मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च केला जातो. नदीपात्रातून जलपर्णी काढून ती निश्चित ठिकाणी वाहतूक करून विल्हेवाट लावणे अपेक्षित असतानाही, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी जलपर्णी नदीच्या काठावरच ढिग करून ठेवली जात असल्याचे यापूर्वी समोर आले होते. आता झालेल्या पावसामुळे वाढलेल्या नदीप्रवाहाने हीच जलपर्णी वाहून गेल्याचे दिसून आल्याने संपूर्ण कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये वारजे येथील स्मशानभूमीजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे तसेच काढलेली जलपर्णी नदीकाठावरच टाकून दिल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यामध्ये झालेल्या विलंबामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांतील  पावसानंतर नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि अनेक महिन्यांपासून नदीत साचलेली तसेच काठावर पडून असलेली जलपर्णी पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये “महानगरपालिकेला जे जमले नाही, ते पावसाने करून दाखवले” अशी चर्चा सुरू झाली आहे.

जलपर्णी हटविण्याच्या निविदांमध्ये स्पायडर मशीनच्या सहाय्याने जलपर्णी काढून ती निश्चित केलेल्या ठिकाणी वाहतूक करून विल्हेवाट लावणे बंधनकारक असते. मात्र, अनेकदा जलपर्णी नदीकाठावरच टाकली जात असल्याने ती पुन्हा नदीत वाहून जाते. अशा परिस्थितीत वाहतूक आणि विल्हेवाटीची प्रक्रिया प्रत्यक्षात कितपत झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याशिवाय, पूर्वगणनपत्रकापेक्षा मोठ्या प्रमाणात कमी दराने निविदा मंजूर केल्या जात असल्याने संबंधित ठेकेदारांकडून पूर्ण क्षमतेने काम केले जात नसल्याचीही चर्चा आहे. परिणामी, जलपर्णी कायमस्वरूपी हटविण्याऐवजी ती पूराच्या पाण्याबरोबर वाहून जाईल, अशीच मानसिकता कामांमध्ये दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरवर्षी नदी स्वच्छतेच्या नावाखाली करोडो रुपयांचा खर्च होत असतानाही जलपर्णीची समस्या कायम आहे. नदीतील सांडपाणी, प्रदूषण आणि जलपर्णी वाढण्याची मूळ कारणे दूर करण्याऐवजी केवळ वरवरच्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. आता पावसानेच जलपर्णी वाहून गेल्याने नदी स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या कामांची परिणामकारकता, खर्चाची उपयुक्तता आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वारजेतील हे चित्र केवळ एका ठिकाणापुरते मर्यादित आहे की संपूर्ण मुळा-मुठा नदीपात्रातील जलपर्णी हटविण्याच्या कामांची हीच स्थिती आहे, याचीही सखोल पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

करोडोंचा खर्च, तरी जलपर्णी पावसानेच वाहून नेली; प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Spread the love

Leave a Reply

You may have missed