येरवडा : पर्णकुटी चौकातील खोदाई कामामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांमध्ये संताप; ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; खोदाईमुळे अपघाताचा धोका – व्हिडिओ

पुणे: येरवडा पर्णकुटी चौकात सध्या खोदाई काम सुरू असून, या कामादरम्यान सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ठिकाणी बॅरिकेड्स, वाहतूक व्यवस्थापक किंवा सुरक्षा कर्मचारी नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, ठेकेदाराने खोदाई सुरू करताना सुरक्षा व वाहतूक नियोजनाचा विचार केलेला नाही. परिणामी, या भागात वाहतूक कोंडी होत असून, अपघात किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पहा व्हिडिओ
महापालिका व वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार
खोदाई कामामुळे पर्णकुटी चौकातील रहिवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. मात्र, पुणे महानगरपालिका व वाहतूक विभाग या स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कामावर कारवाईची मागणी
या संदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक विभागाने तत्काळ कारवाई करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “आमच्या सुरक्षिततेचा विचार न करता खोदाई सुरू आहे. जर काही अनर्थ झाला तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेने त्वरित या कामाची पाहणी करून योग्य सुरक्षा व वाहतूक नियोजन करण्याची गरज आहे, असे नागरिकांचे मत आहे.