अभय योजना की थकबाकीदारांना ‘अभयदान’?; पुणे मनपाच्या कारभारावर सजग नागरिक मंचाचा सवाल
पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने वारंवार राबवलेल्या अभय योजनांचा फायदा नेमका प्रामाणिक करदात्यांना झाला की सराईत थकबाकीदारांना, असा संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. लाखो रुपयांची थकबाकी असतानाही सवलतींचे गाजर दाखवणाऱ्या मनपा प्रशासनाला तब्बल ६७ हजार ९५६ थकबाकीदारांनीच थेट धुडकावून लावल्याने प्रशासनाची ‘अभय’ नीतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारातून उघड झालेल्या आकडेवारीच्या आधारे मनपा प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “वारंवार अभय योजना आणून मनपा नेमका कोणाला प्रोत्साहन देत आहे? वेळेवर कर भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांची ही थट्टा नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनपाने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती. मात्र, या योजनेकडे हजारो थकबाकीदारांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या अभय योजनांचा लाभ घेऊनही अनेक जण पुन्हा थकबाकीदार बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये अभय योजनेचा लाभ घेतलेल्या १ लाख ४९ हजार ६८३ करदात्यांपैकी तब्बल ६७ हजार ४७५ जण पुन्हा थकबाकीदार झाले. त्यातील ४२ हजार ६९६ जणांनी नव्या योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तर २०२१-२२ मधील ६६ हजार ४५४ लाभार्थ्यांपैकी ३८ हजार ६४२ जण पुन्हा थकबाकीदार बनले असून, त्यातील २५ हजार २६० जणांनी यंदाच्या योजनेचाही लाभ घेतलेला नाही.
या सगळ्या प्रकारामुळे “मनपा प्रशासनाची अभय योजना म्हणजे करचुकवेगिरीला अधिकृत संरक्षण तर नाही ना?” अशी उपरोधिक चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. वारंवार सवलती देऊनही थकबाकीदारांवर ठोस कारवाई होत नसल्याने मनपाची प्रशासनिक इच्छाशक्तीच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
दरम्यान, प्रामाणिक करदाते वेळेवर कर भरत असताना, थकबाकीदारांना पुन्हा पुन्हा सवलती देण्याच्या धोरणामुळे संताप व्यक्त होत आहे. “जो कर भरतो तोच मूर्ख ठरतो का?” असा टोला देखील नागरिकांकडून लगावला जात आहे.
“अभय योजना धुडकावून लावणाऱ्यांवर जप्ती, मालमत्ता सील किंवा कायदेशीर कारवाई करून मनपाने स्पष्ट संदेश द्यावा. अन्यथा अभय योजना ही फक्त कागदी घोषणा ठरेल,” असा इशारा सजग नागरिक मंचाने दिला आहे.
आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना फसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासन जागे होणार की पुन्हा नव्या अभय योजनेची घोषणा करून थकबाकीदारांनाच ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.