पुणे: गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला धमकी; ५० हजारांची मागणी करणारे येरवड्यात दोन पोलिस निलंबित

0
Yerwada-Police-Station.jpeg

पुणे : मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणाकडून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांची नावे दयानंद शिवाजी कदम व अश्विन ईश्वर देठे अशी असून, २४ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. येरवडा येथील कॉमर्स झोन कंपनीजवळ एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत रस्त्याच्या कडेला थांबला असताना गस्त घालणारे पोलिस कर्मचारी देठे व कदम त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने येरवडा येथील एका डॉक्टरांची मदत घेत, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी अहवाल सादर केल्यानंतर उपायुक्त जाधव यांनी प्राथमिक चौकशी केली. दोन्ही पोलिसांचे वर्तन हे बेशिस्त, अशोभनीय आणि पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचे आढळल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्यावर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त जाधव यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply