पुणे: पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केला घृणास्पद प्रकार; निगडीमध्ये वाढला गुन्हेगारीचा धक्क
पुणे : सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने जामिनावर सुटून पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
ही घटना निगडी येथील लि सोफिया एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती शाळेत घडली आहे. आरोपी शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर, गुन्हा दाखल होऊनही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याच्या प्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर जबाबदार व्यक्तींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
निवृत्ती देवराम काळभोर या शिक्षकासह कीर्ती शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, लि सोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव, अविंद्र निकम, गोरख जाधव, हनुमंत निकम आणि शुभांगी जाधव यांना पोलिसांनी गजाआड केले आहे, तर लक्ष्मण हेंद्रे हा अद्याप फरार आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटना अशी होती की, पीडित मुलगी वॉशरूममधून बाहेर येत असताना काळभोर यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने हे घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा शाळेत नोकरी मिळाली
आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुद्ध 2018 मध्ये निगडी पोलीस ठाण्यात शाळेतील एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जामिनावर सुटूनही, शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नोकरीवर घेतले होते. काळभोर याच्यासारखा विकृत वृत्तीचा शिक्षक पुन्हा शाळेत नियुक्त केल्याने शाळा व्यवस्थापनाने लैंगिक अत्याचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. म्हणून शिक्षक काळभोर याच्यासह शाळेचे प्राचार्य अशोक जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास जाधव आणि इतर संबंधित आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.