पुणे : विद्यार्थी सुरक्षातेबाबत पोलीस ऍक्शन मोडवर – वाचा सविस्तर

पुणे: बदलापूर येथे घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणानंतर, पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सुरक्षा उपायांची तपासणी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढवण्याचे अभियान सुरु केले आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या दामिनी मार्शल पथकाने आज विमाननगर येथील अनेक शाळांना भेटी दिल्या. त्यांनी शाळांच्या परिसरातील सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्थांची तपासणी केली. तसेच शालेय कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी, विद्यार्थ्यांची वाहतूक यामध्ये पाळल्या जाणाऱ्या नियमांची पाहणी केली.
यावेळी पथकाने शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर कार्यशाळा घेतली. विद्यार्थ्यांनी वाईट स्पर्श ओळखण्यासाठी आणि त्यावेळी कोणाशी संपर्क साधायचा याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. शाळांमध्ये तक्रार पेटीचा वापर कसा करायचा, याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्याचे बालस्नेही अधिकारी सामू चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रोज शाळांना भेटी देण्याचे आश्वासन दिले. पोक्सो कायद्याबाबतही जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये सीसीटीव्ही, तक्रार पेटी बसवून सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे संत गोरोबा बालविद्यानिकेतनचे मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी सांगितले.