९५ हजारांची लाच घेऊन पसार झालेला पोलीस हवालदार दीड महिन्यानंतर जेरबंद; शिरूर नगर परिषद परिसरातून अटक

0
IMG_20261116_202217

पुणे : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्याची चाहूल लागताच रक्कम आणि तक्रारदाराची कागदपत्रे घेऊन पसार झालेल्या पोलीस हवालदाराला अखेर दीड महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शिरूर नगर परिषद परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

सतीश नाथराव मुंढे (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. १ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दोन स्वतंत्र कारवाया केल्या होत्या. त्यापैकी एका प्रकरणात सतीश मुंढे याच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्याने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीदरम्यान मुंढे याने ९५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ९५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर कारवाईची चाहूल लागताच मुंढे याने लाचेची रक्कम आणि तक्रारदाराकडील कागदपत्रे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर तो फरार होता.

दरम्यान, पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी तपासाची सूत्रे हलवत १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शिरूर नगर परिषद परिसरातून मुंढे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लाच स्वीकारल्यानंतर सरकारी कारवाईपासून बचाव करण्यासाठी पसार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अखेर दीड महिन्यानंतर अटक झाल्याने पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed