धायरी फाटा–उंबऱ्या गणपती चौक रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर..!‘नो हॉकर्स झोन’ची मागणी..!!

0
IMG_20261017_12492438

पुणे, धायरी | दि. १७ ऑक्टोबर २०२६ :

धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर पुणे महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

धायरी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यातच हातगाड्या, पथारी व्यावसायिक आणि रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवण्याची गरज

वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना आवश्यकतेच्या वेळी विनाअडथळा मार्ग उपलब्ध राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने संबंधित रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्याबाबत निर्णय घ्यावा आणि फेरीवाले व अतिक्रमणांबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आता महापालिका प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोणती कार्यवाही करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed