वारजे एनडीए रोडवर तुटलेली केबल रस्त्यावर; अपघाताची भीती, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा सवाल

0
20260724_71348AMByGPSMapCamera

पुणे, प्रतिनिधी : वारजे येथील एनडीए रोडवरील ज्ञानेश सोसायटीसमोर मुख्य रस्त्यावर केबल तुटून लोंबकळत पडली असून, ज्ञानेश सोसायटी ते दिगंबरवाडी शाळा कोपरा रस्ता या संपूर्ण परिसरात ही केबल रस्त्यावर असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एनडीए रोडवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तसेच रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील तुटलेली केबल वेळेवर दिसत नाही. परिणामी दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लोंबकळणाऱ्या केबलमुळे यापूर्वीही अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही संबंधित विभागाकडून या धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
एनडीए रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून नागरिकांची गैरसोय अधिक वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून तुटलेली केबल हटवावी, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, “एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? आणि अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed