कोट्यवधींचा खर्च, जलपर्णी मात्र ‘जैसे थे’; नदी स्वच्छ की कागदोपत्री?
नदीतून काढली की नदीकाठी रचली? ठेकेदारांच्या कामावर आणि प्रशासनाच्या देखरेखीवर नागरिकांचा सवाल
वारजे, दि. २९ : महाराष्ट्र माझा न्युज – मुळा-मुठा नदी स्वच्छतेच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात, निविदा निघतात, यंत्रे धावतात, अहवाल तयार होतात… पण नदीत जलपर्णीचा विळखा मात्र तसाच कायम! वारजे स्मशानभूमीजवळील नदीपात्रातील विदारक परिस्थिती पाहता “काम झाले नेमके कुठे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पहा व्हिडिओ
नियमांनुसार स्पायडर मशीनने जलपर्णी काढून ती निश्चित ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र नदीतून काढलेली जलपर्णी नदीकाठावरच ढिगाऱ्याच्या स्वरूपात पडलेली दिसत आहे. म्हणजे जलपर्णी हटविण्याऐवजी तिचे केवळ ‘स्थलांतर’ झाले का, अशी उपरोधिक चर्चा परिसरात रंगली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर हीच जलपर्णी पुन्हा नदीत वाहून जाणार आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच कामासाठी कोट्यवधींचा खर्च होणार का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. जलपर्णीचे मूळ उच्चाटन करण्याऐवजी ती पुराच्या भरोशावर सोडण्याचीच पद्धत राबवली जात असल्याचा आरोप होत आहे.
यात भर म्हणजे, अंदाजपत्रकापेक्षा कमी दरात मंजूर होणाऱ्या निविदांमुळे ठेकेदारांकडून दर्जेदार काम होण्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. कमी दर, अपूर्ण काम आणि पूर्ण बिल… असा प्रकार सुरू आहे का, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ असणे अपेक्षित असताना, जूनअखेरही नदीपात्र जलपर्णीने व्यापलेले दिसत आहे. मग नियोजन कुठे चुकले? प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली की केवळ फाईलवरील अहवालांवरच समाधान मानले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी “नदी स्वच्छता अभियान” गाजते, फोटोसेशन होते, खर्चाचे आकडे जाहीर होतात; पण नदी मात्र वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत दिसते. त्यामुळे आता केवळ जलपर्णी हटविण्याच्या कामांची नव्हे, तर खर्च, वाहतूक, विल्हेवाट आणि संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.