पुणेकरांच्या पैशांची ‘वस्त्रहरण’ कथा! २ कोटींचे गणवेश ९ वर्षे गोदामात, प्रशासन मात्र निर्वस्त्र जबाबदारीचे
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचा आणखी एक ‘प्रताप’ समोर आला असून, २ कोटी रुपयांचे गणवेश, साड्या आणि साहित्य तब्बल ९ वर्षे धूळ खात पडून असल्याचे उघड झाले आहे. कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केलेले कपडे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत; मात्र कंत्राटदारांचे बिल मात्र वेळेत अदा झाले — हीच तर खरी प्रशासनाची कार्यक्षमता!
२०१५-१६ मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी गणवेश खरेदी करण्यात आले. पुणेकरांच्या करातून उभारलेले हे २ कोटी रुपये खर्च झाले, पण कपडे मात्र वडगाव बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत ‘विश्रांती’ घेत राहिले. प्रशासनाला ते वाटण्याची आठवण झाली नाही, की फाइलांच्या ढिगाऱ्यात जबाबदारीच हरवली — हा खरा प्रश्न आहे.
मनसेचे नेते हेमंत संभूस यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे चौकशी सोपवली. चौकशी अहवालात तक्रारीतील तथ्य समोर आले आणि ९ वर्षांनंतर लक्षात आले की कपडे आता वापरण्यायोग्यच उरलेले नाहीत. म्हणजे करदात्यांचे २ कोटी रुपये अक्षरशः धुळीत मिळाले.
या प्रकरणी २० आजी-माजी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. काही अधिकारी निवृत्त झाले असले तरी जबाबदारीपासून ‘निवृत्ती’ मिळत नाही, हे प्रशासनाला आठवले, हीच जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र, इतकी वर्षे ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही, याचे उत्तर कोण देणार?
पुणेकरांच्या पैशांची उधळण, कर्मचाऱ्यांची फसवणूक आणि प्रशासनाची बेफिकिरी — या त्रिसूत्रीमुळे महानगरपालिकेची प्रतिमा पुन्हा एकदा धुळीत गेली आहे. आता प्रश्न एकच — नोटीस देऊन मामला थंडावणार, की खऱ्या अर्थाने जबाबदारांवर कारवाई होणार? पुणेकरांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलाकडे लागले आहे.