पुणे: महापालिकेत फेशियल बायोमेट्रिक अनिवार्य; मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या रांगा

biometric-device-dasds_2025031422115.jpg

पुणे : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनियमित हजेरीबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. सोमवारपासून महापालिका मुख्यालयात ‘आधार-बेस्ड फेशियल बायोमेट्रिक’ हजेरी प्रणाली सक्तीची करण्यात आली असून, १ जानेवारीपासून ही अट सर्व परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालये आणि इतर विभागांनाही लागू होणार आहे.

नवीन प्रणाली सुरू होताच महापालिका भवनात बायोमेट्रिक मशीनसमोर मोठी गर्दी होत असून, विशेषतः सुट्टीच्या वेळेत कर्मचाऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत.

महापालिकेतील अनेक कर्मचारी वेळेवर कार्यालयात न येणे, दुपारनंतर अनुपस्थित राहणे, तसेच पूर्णवेळ कार्यालयात न थांबणे याबाबतच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठांकडे सातत्याने दाखल होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीच्या आधारेच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यालयात सुरू झाली असून, पुढील टप्प्यात सर्व परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालये आणि शाखांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पूर्णपणे अनिवार्य केली जाणार आहे. ही प्रणाली काटेकोरपणे राबवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या अनियमित हजेरीवर प्रभावी नियंत्रण आणि कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

Spread the love

You may have missed