धाराशिवचा ‘सिंघम’ लाचखोरीत अडकला! — महिला सहकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी १ लाखाची लाच मागणाऱ्या पीआय मारुती शेळकेला एसीबीच्या जाळ्यात अटक

धाराशिव, २७ जून — ‘लनिग्रहणाय संरक्षणाय’ ही बिरूदावली मिरवणाऱ्या पोलिस दलातील एका अधिकाऱ्यानेच आपल्या वर्तनाने खात्याची नाचक्की केली आहे. अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटापासून प्रेरणा घेत स्वतःला ‘सिंघम’ म्हणवून घेणाऱ्या पोलिस निरीक्षक मारुती शेळकेला लाचखोरीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे.
शेळकेने पोलीस दलातीलच एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही लाच त्याने आपली सहकारी मुक्ता लोखंडे यांच्यामार्फत स्वीकारली. मात्र, एसीबीने आखलेल्या कारवाईत तो सापडला.
सिंघम ते लाचखोर – एक धक्कादायक प्रवास
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मारुती शेळके हे सिंघमची स्टाईल अंगीकारत स्वतःला ‘बाजीराव सिंघम’ म्हणून मिरवत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या कार्यशैलीबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तरीही त्यांच्या धडाकेबाज वागणुकीला लगाम लागलेला नव्हता.
या प्रकरणात पीडित महिला ही पोलीस दलात कार्यरत असून, तिच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत शेळकेने लाचेची मागणी केली. लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी सापळा रचला.
कार्यालयात एसीबी अधिकाऱ्यांच्या आगमनाने गडबड उडालेल्या शेळकेने चोरासारखा पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीने तब्बल एक किलोमीटर पाठलाग करत शेळकेला जेरबंद केलं. या नाट्यमय प्रसंगाचा सीसीटीव्ही व्हिडिओही उपलब्ध झाला असून, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनीही हे दृश्य प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त इतिहास, तक्रारींचा इतिहासही तगडा
शेळके यांच्याविरोधात यापूर्वीदेखील विविध तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलीस खात्यातीलच अधिकारपदावर असतानाही त्यांनी निष्पाप नागरिकांवर अन्याय केल्याचे प्रकार समोर आले आहेत. एका युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचं भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्या पीडिताने आता उघडपणे केला आहे.
कर्तव्याचा अपमान, ईमानाशी गद्दारी
लाच मागणं हे काही नविन नाही, पण पोलीस खात्यातीलच अधिकारी महिला सहकाऱ्याच्या मुलासाठी असा अनैतिक व्यवहार करतो हे अत्यंत लाजीरवाणं आहे. या घटनेमुळे पोलीस खात्याच्या शिस्तीवर, पारदर्शकतेवर आणि जनतेच्या विश्वासावर गालबोट लागले आहे.
एसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
—
📌 संपादकीय टिप्पणी
सिंघम होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या शेळकेला अखेर चोरासारखं पळावं लागलं हे अत्यंत विडंबनात्मक वास्तव आहे. कायद्याचे रक्षकच जर लाचखोर ठरणार असतील, तर सामान्य माणूस न्यायासाठी कुणाकडे पाहणार?