पुण्यात सायबर सुरक्षेला चालना; पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव

0
Amitesh-Kumar.webp

पुणे : प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांचीही मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “सध्या शिवाजीनगर येथील एकमेव सायबर पोलीस ठाण्यात दररोज सरासरी १०० ते १५० सायबर तक्रारी नोंदविल्या जातात. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल घोटाळे, आर्थिक गैरव्यवहार अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे.”

नवीन सायबर पोलीस ठाण्यांसाठी प्रशिक्षित पोलीस कर्मचारी, अत्याधुनिक तांत्रिक साधने आणि स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सहावे परिमंडळ स्थापन होणार

पुणे शहराच्या विस्तारासोबतच पोलिस यंत्रणेचीही पुनर्रचना सुरू आहे. सध्या शहरात पाच परिमंडळ आहेत. आता सहावे परिमंडळ तयार करण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. नव्या पोलीस ठाण्यांच्या स्थापनेनंतर गुन्हे नियंत्रण, गस्त व्यवस्था आणि तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

१००० पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीची गरज

पोलिस दलासाठी आधीच १६०० कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती, त्यातील ८०० कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित १००० पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती आवश्यक असल्याने यासंबंधीचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला आहे.

ग्रामीण हद्दीतील दोन पोलीस ठाण्यांचा शहरात समावेश

लोणीकंद आणि लोणी काळभोर ही दोन पोलीस ठाण्ये आता अधिकृतपणे पुणे शहर पोलीस दलाच्या अखत्यारीत आली आहेत. याशिवाय सात नवीन पोलीस ठाण्यांचे कामही सुरू असून, सायबर सुरक्षेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.

सायबर गुन्ह्यांच्या विरोधात अधिक परिणामकारक लढा देण्यासाठी पुणे पोलिसांनी उचललेले हे पाऊल भविष्यातील सुरक्षिततेसाठी मोलाचे ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed