पुणे जिल्ह्यात १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे, प्रतिनिधी – गेल्या काही वर्षांपासून पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे झुकलेला असताना, अनेक शाळा कोणती अधिकृत आहेत आणि कोणत्या अनधिकृत याची स्पष्ट माहिती नसल्याने पालकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि जिल्ह्यात सध्या १३ शाळा पूर्णतः अनधिकृत आहेत. याशिवाय, २४ शाळा सरकारी मान्यता असूनही त्यांच्या मूळ जागेवर कार्यरत नाहीत, तर ९ शाळांकडे फक्त हेतूपत्र (लेटर ऑफ इंटेंट) असून त्यांना अंतिम मान्यता मिळालेली नाही.
शहर आणि ग्रामीण भागातही कारवाई
दौंड, हवेली, पुरंदर, मावळ, मुळशी, खेड, तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत अशा शाळांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे मुळशी तालुक्यात सर्वाधिक ७ शाळा मूळ जागेवर नाहीत, तर पुणे महापालिका क्षेत्रातील ९ शाळा अशा प्रकारे कार्यरत आहेत.
शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश
जिल्हा प्रशासनाने संबंधित गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, तसेच महापालिकांच्या शिक्षण विभागांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षण विभागाचे अधिकारी संजय नाईकडे यांनी स्पष्ट केले की, “पालकांनी अशा शाळांपासून सावध राहावे आणि त्यांच्या पाल्यांना अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश देऊ नये. अन्यथा विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते.”
सहा महिन्यांत दुसरी यादी
याआधी जानेवारी 2025 मध्येही १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली होती. आता शाळा सुरू होण्याच्या तोंडावर ही यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात त्याच दोन शाळांची नावे पुन्हा समाविष्ट झाली आहेत.
अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. एस.पी. इंग्रजी माध्यम शाळा, आवलवाडी, वाघोली
2. कलर स्कूल, ताथवडे
3. न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेर्णे
4. किंग्सवे पब्लिक स्कूल, लोणावळा
5. माझी शाळा, ताथवडे
6. ज्ञान सागर एज्युकेशन सोसायटी – न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी
7. आयडियल पब्लिक स्कूल, धायरी
8. महात्मा गांधी प्रशाला, संजय पार्क इंग्लिश
9. टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल अँड मकतब, कोंढवा खुर्द
10. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक
11. इमॅन्युएल पब्लिक स्कूल, हडपसर
12. मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल, शेवाळवाडी, सोलापूर रोड
13. आर्यन वर्ल्ड स्कूल, नर्हे
शाळा निवडताना काय काळजी घ्यावी?
शाळेची शासकीय मान्यता आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळेची मान्यता क्रमांक, पत्त्याशी सुसंगततेची पडताळणी आणि शाळेची वेबसाइट किंवा शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीचा अभ्यास केल्यास पालक फसवणुकीपासून वाचू शकतात.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “अधिकार्यांकडून पुढील काळात तपासणी सुरूच राहणार असून, आवश्यक त्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल.”
—
🔴 वाचकांच्या माहितीसाठी: आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश देण्यापूर्वी शाळेची अधिकृत मान्यता तपासा!