येरवडा : डॉ. माया लोहार यांची तात्काळ बदली; स्व. राजीव गांधी रुग्णालयातील तक्रारींवर आरोग्य विभागाची तात्काळ कारवाई

येरवडा, दि. १० जून: स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा येथे मागील काही महिन्यांपासून विविध सुविधा अभावामुळे रुग्ण आणि नागरिक हैराण झाले होते. यासंदर्भात मोहल्ला कमिटी सदस्यांनी वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने अखेर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. डॉक्टर माया लोहार यांची तात्काळ बदली करण्यात आली असून, हॉस्पिटलमधील अनेक सुविधा सुरळीत करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
९ जून रोजी मोहल्ला कमिटी सदस्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांची भेट घेऊन हॉस्पिटलमधील गंभीर समस्यांवर लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत लिफ्ट काम न करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, यादीतील इंजेक्शन्स वेळेवर न मिळणे, टी. टी. इंजेक्शनचा अभाव, अशा महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या होत्या.
तसेच, गेली दोन वर्षे स्थानिक नागरीक व सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर हॉस्पिटलमध्ये बसवलेला ऑक्सिजन प्लांट अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही, यावर कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
या तक्रारीची तात्काळ दखल घेत डॉ. बोराडे यांनी हॉस्पिटलमध्ये लिफ्ट, सीसीटीव्ही आणि इतर सुविधा सुरळीत करण्यास सुरुवात केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर माया लोहार यांची तडकाफडकी बदली करून नवीन व्यवस्था लागू करण्यात आली.
या कारवाईसंदर्भात मोहल्ला कमिटी सदस्य एजाज खान, शशीकांत साटोटे, किर्ती माछरेकर, गणेश भोसले, गणेश धायमुक्ते, सलमा शेख, जया मुकनाक, अंजली भोसले, सरस्वती वाल्मिक आणि रुकय्या शेख यांनी एकत्रितपणे भूमिका बजावली.
“डॉ. नीना बोराडे मॅडम यांनी आमच्या तक्रारींची गंभीर दखल घेत हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले असून अनेक समस्या तात्काळ निकाली काढल्या. आम्ही त्यांचे आभार मानतो. परंतु याचे श्रेय कोणी राजकीय हेतूने घेऊ नये,” अशी प्रतिक्रिया मोहल्ला कमिटी सदस्यांनी दिली आहे.
पुणे महापालिका निवडणुका जवळ येत असताना अशा समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्पर राहावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
—