विमाननगरमध्ये ‘नो पार्किंग’वरच पार्किंग; आणि वाहतूक कर्मचारी ‘वसुली’त व्यस्त?
पुणे: शहरातील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगच्या समस्येने नागरिक हैराण झाले असताना, विमाननगर परिसरात या प्रश्नाने अक्षरशः विकोप गाठला आहे. नगर रोड ते काश्मिरी सॉफ्ट रोड, दत्त मंदिर चौक, निओ गार्डन ते साकोरेनगर या भागात रस्त्यांवर दुहेरी पार्किंगचा कहर सुरू असून, स्थानिकांच्या मते हे रस्ते आता “अनधिकृत पार्किंग झोन” बनले आहेत.
या सर्व प्रकारात विशेष म्हणजे, नागरिकांचा रोष केवळ वाहनधारकांवर नसून थेट वाहतूक विभागावरही आहे. कारण, “नियम अंमलात आणण्याऐवजी कर्मचारी केवळ वसुलीत व्यस्त असतात,” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी केला आहे.
विमाननगरमधील कॉर्पोरेट कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनं उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या परिस्थितीत शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र समोर येत आहे.
कारवाईपेक्षा ‘कारभार’ महत्त्वाचा?
स्थानिकांच्या मते, अनेकदा वाहतूक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असतात; मात्र नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ते काही वाहनधारकांभोवती घोळका करून उभे राहतात. “ही कारवाई आहे की वसुली?” असा उपरोधिक सवाल नागरिक विचारत आहेत.
एका रहिवाशाने संताप व्यक्त करत सांगितले, “आम्ही दोन मिनिटं वाहन उभं केलं तर लगेच दंड; पण दिवसभर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांकडे कोणीच लक्ष देत नाही. हे नक्की नियमांचं पालन आहे की निवडक कारवाई?”
दुकानदारांचा व्यवसाय धोक्यात, प्रशासन मात्र निवांत
रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंगमुळे ग्राहकांना पार्किंग मिळत नसल्याने स्थानिक व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. “ग्राहक येण्याआधीच परत जातात,” अशी तक्रार दुकानदार करत आहेत. मात्र, या गंभीर समस्येकडे वाहतूक विभागाकडून केवळ औपचारिक मोहिमा राबवण्यापलीकडे ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
१५ दिवसांची मुदत, पण प्रश्न कायमच?
वाहतूक विभागाने संबंधित कंपनीला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. तसेच विशेष मोहीम राबवून कारवाई सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रश्न एकच — नियम सर्वांसाठी की काहींसाठी?
विमाननगरमधील परिस्थिती पाहता, वाहतूक नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच लागू आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृत पार्किंगवर कारवाईपेक्षा “व्यवहार” अधिक महत्त्वाचा ठरत असेल, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे भवितव्य काय, असा टोमणा नागरिकांनी लगावला आहे.
आता प्रशासन आणि वाहतूक विभाग खरोखरच कठोर पावले उचलणार की ही समस्या नेहमीप्रमाणे कागदावरच सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.