राजीव गांधी रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा रविवारी बंद?
‘२४ तास सेवा’च्या फलकावर प्रश्नचिन्ह; आपत्कालीन तपासणीसाठी खासगी केंद्राचा सल्ला
येरवडा : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात सोनोग्राफीची तातडीची गरज असतानाही रविवारी सेवा उपलब्ध न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत सोनोग्राफी करण्यास सांगितले असताना संबंधित केंद्राकडून सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णांना आपत्कालीन तपासणीसाठी नेमके कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने आपल्या नातेवाईकाला सोनोग्राफीसाठी राजीव गांधी रुग्णालयातील भारत डायग्नोसिस येथे नेले होते. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी रविवार असल्याने सोनोग्राफी सेवा बंद असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. डॉक्टरांनी तातडीने सोनोग्राफी करण्यास सांगितल्याचे स्पष्ट करूनही रुग्णाला आवश्यक मदत मिळाली नसल्याचा आरोप संबंधित नागरिकाने केला आहे. तसेच खासगी ठिकाणी सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या परिसरात २४ तास सेवा उपलब्ध असल्याचे नमूद करणारे फलक लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आपत्कालीन रुग्णांना सोनोग्राफी अथवा एक्स-रेसारख्या आवश्यक तपासण्या उपलब्ध होत नसतील, तर या फलकांचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकाराबाबत संबंधित नागरिकाने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयातील निदान सेवा प्रत्यक्षात २४ तास उपलब्ध आहेत की नाहीत, याची तपासणी करावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आवश्यक तपासण्या वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित केंद्राची बाजू आणि रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण उपलब्ध नसल्याने सेवा बंद असण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल.