आरटीओचा इशारा: वेळेत नंबर प्लेट बसवा, अन्यथा दंडाची कारवाई; २०१९ पूर्वीच्या वाहनांना नवी नंबर प्लेट सक्तीची – आरटीओचा आदेश

जुन्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ सक्तीची, ३१ मार्च अंतिम मुदत – पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची सूचना
पुणे: शहरातील २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (एचएसआरपी) लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी वाहनधारकांना ३१ मार्च २०२४ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिली आहे.
एचएसआरपी बसवण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, वाहनधारकांना सोयीस्कर अपॉइंटमेंट मिळावी यासाठी एजन्सीने विशेष पोर्टल विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे.
काय आहे ‘एचएसआरपी’?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ साली दिलेल्या आदेशानुसार, एक एप्रिल २०१९पासून नवीन नोंदणी होणाऱ्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, २०१९पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही अट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारांच्या अधिकारात ठेवण्यात आला होता.
राज्याच्या पुढाकाराने निर्णय
राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. याआधी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये २०१९पूर्वीच्या वाहनांसाठी एचएसआरपी बंधनकारक करण्यात आली होती. आता महाराष्ट्र परिवहन विभागानेही तीच पद्धत अवलंबत पुण्यासह पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यक्षेत्रातील जुन्या वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे.
वाहनधारकांनी लवकरात लवकर नंबर प्लेट बसवून घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.