पुणे: आयुक्तांच्या आदेशावर आकाशचिन्ह विभागाची कारवाई; ९५ जणांवर गुन्हे दाखल, बेकायदा जाहिरात फलकांवर कडक कारवाई

पुणे: शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक आणि बॅनर काढून टाकण्याची मोहीम पुणे महापालिकेने हाती घेतली आहे. आठ दिवस राबविलेल्या या मोहिमेत ७४० फलक काढण्यात आले असून, ९५ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने ही मोहीम राबवली. शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या बेकायदा जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय, मुख्य चौकांमध्ये लावलेल्या मोठ्या फलकांमुळे वाहतूक सिग्नल झाकले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
महापालिकेच्या या मोहिमेत फलक आणि बॅनर काढून टाकण्यासोबतच संबंधितांकडून ६.६७ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर आमदारांच्या विजयाच्या शुभेच्छा देणारे मोठ्या प्रमाणावर फलक व बॅनर शहरात लावण्यात आले होते. महापालिकेने याबाबत इशारा देऊनही परवानगीशिवाय जाहिरात फलक लावण्याचे प्रकार सुरूच असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले की, “आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम भविष्यातही सुरूच राहील.”
महापालिकेने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २४४ आणि २४५ अन्वये संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. शहरातील स्वच्छता आणि सौंदर्य टिकवण्यासाठी अनधिकृत जाहिरात फलकांवर अशी कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.