पुणे: पाच हजारांची लाच घेताना महसूल अधिकारी रंगेहाथ पकडले; महसूल सहाय्यक यापूर्वीही लाच प्रकरणात दोषी
पुणे: शिरूर तहसील कार्यालयात ५ हजार रुपयांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती पुणे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.
अधिकारी नितेशकुमार धर्मापुरीकर अटकेत
पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर असून ते शिरूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत होते. याआधीही त्यांच्यावर इंदापूरमध्ये लाच प्रकरणी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.
सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करण्यासाठी लाच मागणी
२८ वर्षीय तक्रारदाराने गट नंबरच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. संबंधित अर्ज धर्मापुरीकर यांच्याकडे प्रलंबित होता. त्यांनी तक्रारदाराकडे कामासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर विभागाने कारवाईसाठी योजना आखली.
रंगेहाथ पकडले
तक्रारदाराच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, धर्मापुरीकर यांनी ५ हजार रुपये लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे करत आहेत. ही कारवाई पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिरूर तहसील कार्यालयातील या घटनेमुळे महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.