पुणे: सरकारी काम? फक्त एक क्लिक करून; नववर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालय कागदविरहित होणार;

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ई-ऑफिस प्रणालीचा विस्तार सुरू
पुणे: जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय कामकाज कागदविरहित आणि अधिक गतिमान करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. नवीन वर्षापासून कार्यालयातील सर्व शाखांचे कामकाज या प्रणालीद्वारे होणार असून, नागरिकांची रखडणारी कामे वेळेत मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ सालीच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, निवडणूक, पुनर्वसन, राजशिष्टाचार, पुरवठा विभाग आदी शाखांमध्ये याचा प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून, अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी आणि डिजिटल स्वाक्षऱ्याही तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा समन्वयक पल्लवी घाडगे यांनी दिली.
टपाल विभागाचे संगणकीकरण पूर्ण
जुलै महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील टपाल विभागाचे काम शंभर टक्के संगणकीकृत करण्यात आले आहे. विभागांकडे येणारे अर्ज थेट संबंधित विभागाला पाठवले जात असल्याने प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्जांवरील पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. अर्जाची स्थिती आणि निकाल नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे.
पारदर्शकता आणि गतिमानता हा उद्देश
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा पूर्णतः अवलंब करण्याचे उद्दिष्ट आहे. नववर्षात याची अंमलबजावणी अधिक वेगाने होणार आहे. या प्रणालीमुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि गतिमानता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केला. लवकरच इतर शासकीय कार्यालयांतही ही प्रणाली लागू होईल.