पुणे: थेऊर व लोणी काळभोर परिसरात दोन जुगार अड्ड्यांवर छापा : चौघांना अटक, ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. १३ एप्रिल : थेऊर आणि लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिली कारवाई थेऊरजवळील तुपे वस्तीजवळ करण्यात आली. झुडपांत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत राजेभाऊ शेषराव मुसळे (वय ४०, रा. थेऊरगाव) आणि राम राजेंद्र गिरे (वय ३६, रा. कुंजीरवाडी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८२ हजार ५८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत लोणी स्थानकाजवळील कदमवाक वस्तीनजीक सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून दत्तात्रेय नवनाथ मोहोळकर (वय ५१, रा. म्हातोबा आळंदी) आणि तात्याराम महादेव ससाणे (वय ५१, रा. लोणी काळभोर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून १,७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बोबडे, दिगंबर सोनटक्के, महेश चव्हाण, रवी आहेर, मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे आणि संदीप धुमाळ यांनी संयुक्तरीत्या केली.