पूणे: हॉटेल युनिकॉर्न हाऊसवर पोलिसांची कारवाई – येरवडा पोलिसांकडून सील

पुणे, दि. 11 एप्रिल 2025 : येरवडा येथील सेलिब्रम आयटी पार्कमधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस येथे गुरुवारी मध्यरात्री वादविवाद व भांडण झाल्याची घटना घडली. ही घटना 11 एप्रिल रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली असून, येरवडा पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई केली.
पोलिसांनी रात्री 1.45 वाजता घटनास्थळी भेट दिली असता, हॉटेल बंद करण्यात आले होते व साफसफाई सुरू होती. वादावरून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त न झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या हॉटेलविरुद्ध यापूर्वीही दोन गुन्हे आणि दहा खटले दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याच्या पार्श्वभूमीवर आणि हॉटेलमध्ये वारंवार गैरकृत्ये घडत असल्याने येरवडा पोलिसांनी हॉटेल युनिकॉर्न हाऊसवर कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142(2) अंतर्गत हॉटेल सील केले आहे.
या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी येरवडा पोलिसांकडून अधिक कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.