पुणे: औंध जिल्हा रुग्णालयात औषध चोरीचा पर्दाफाश; मेफेंटरमाइनच्या २० व्हायल्स गायब, कर्मचारी निलंबित

0
pudhari_import_wp-content_uploads_2024_02_aundha.jpg

पुणे : औंध जिल्हा रुग्णालयात (एडीएच) औषध चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या फार्मसी विभागातून मेफेंटरमाइन सल्फेटच्या तब्बल २० व्हायल्स चोरल्याच्या आरोपावरून वर्ग ४ कर्मचारी स्वप्नील चव्हाण यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी चौकशीत ही चोरी कबूल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ येम्पले यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधांच्या नोंदींच्या तफावतीतून ही चोरी समोर आली. गेल्या आठवड्यात कालबाह्य औषधांची छाननी सुरू असताना फार्मसीच्या रजिस्टरमध्ये मोठी विसंगती आढळली. अंतर्गत चौकशीदरम्यान चव्हाण यांच्याकडून संशय वाढला आणि अधिक चौकशीत त्यांनी २० व्हायल्स चोरल्याचे मान्य केले.

मेफेंटरमाइन सल्फेट हे ‘शेड्यूल एच’ श्रेणीतील औषध असून प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करण्यास मनाई आहे. हे औषध हृदयाची कार्यक्षमता वाढविणारे स्टिम्युलंट असल्याने त्याचा गैरवापर होत असल्याचे पूर्वी अनेक प्रकरणांत समोर आले आहे. काळ्या बाजारात या औषधाला मोठी मागणी असल्याचेही अधिकारी सांगतात. याआधीही पुणे पोलिसांनी अशा औषधांच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी जिम प्रशिक्षक आणि तरुण व्यावसायिकांना अटक केली आहे.

निलंबन कालावधीत स्वप्नील चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालय, आळंदी येथे मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत १० नोव्हेंबर २०२५ रोजी हा निलंबन आदेश काढण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीचे ऑडिट आदेश

या प्रकरणानंतर जिल्हा आरोग्य विभागाने सर्व सरकारी रुग्णालयांतील औषध व उपकरण साठ्याची जिल्हाव्यापी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी प्रत्येक रुग्णालयाने प्रत्यक्ष साठापडताळणी अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ऑडिटदरम्यान गैरव्यवहार, निष्काळजीपणा अथवा साठ्यातील तफावत आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती डॉ. येम्पले यांनी दिली.

या प्रकरणामुळे सरकारी रुग्णालयातील औषधसाठा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लवकरच मोठ्या प्रमाणावर चौकशी होत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed