पुणे: चंद्रकांतदादा पाटील यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री, आज शपथविधी

पुणे: कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून, आज त्यांचा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्रकांतदादांची कारकीर्द प्रभावी निर्णयांनी भरलेली आहे.
चंद्रकांतदादा पाटील: जीवन प्रवास
चंद्रकांतदादा यांचा जन्म १० जून १९५९ रोजी प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांनी मिल कामगार म्हणून काम केले. राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथून बी.कॉम. पदवी घेतली. त्यांची पत्नी सौ. अंजली पाटील या आयसीडब्ल्यूए (कॉस्ट ऑडिटर) आहेत.
प्रभावी राजकीय कार्य
चंद्रकांतदादांनी २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रवेश केला आणि २०१९ व २०२४ मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांनी मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वस्त्रोद्योग धोरण अंमलबजावणीसाठीही त्यांनी योगदान दिले.
प्रदेशाध्यक्ष पदावरून राज्यातील यशस्वी नेतृत्व
२०१९ ते २०२२ या काळात चंद्रकांतदादा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकून बहुमत मिळवले.
सामाजिक बांधिलकीचे कार्य
चंद्रकांतदादांनी “समुत्कर्ष सोशल फाउंडेशन” आणि “मानसी उपक्रम” यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया उपक्रम, आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी विविध योजना राबवल्या. कोव्हिड काळात त्यांनी केलेल्या सेवा कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.
आज शपथविधी
आज चंद्रकांतदादा पाटील आपल्या मंत्रिपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या विकासात नव्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ मंत्रिमंडळात होणार असल्याने जनतेत मोठी उत्सुकता आहे.