पुणे : आकाशचिन्ह व परवाना विभागाची शहरातील सतराशे होर्डिंगला नोटीस
महापालिकेच्या परवाना विभागाने शहरातील नियमांचा भंग केलेल्या 1,699 होर्डिंगसाठी संबंधितांना नोटीस बजावली होती.
यातील 1,024 होर्डिंग दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनांनी चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरु केली.
अधिकृत होर्डिंगच्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु क्षेत्रीय कार्यालयांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नव्हती. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी होर्डिंगबाबतचा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती, मात्र तो देखील वेळेत सादर करण्यात आला नाही. त्यानंतर, महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलत होर्डिंगचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
या फेरसर्वेक्षणात, होर्डिंगची छायाचित्रे घेण्याचे आणि कोणते नियम तोडण्यात आले आहेत हे नमूद करण्यास सांगितले होते. त्यानुसार, महापालिकेने परवानगी दिलेल्या 2,638 होर्डिंगपैकी 1,699 होर्डिंगधारकांनी नियमांची पायमल्ली केली असल्याचे आढळून आले. यापैकी 1,024 होर्डिंगधारकांनी दुरुस्ती केली आहे. तसेच, 15 मे ते 19 जुलै या काळात महापालिकेने 100 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.