पिंपरी: फुलेनगरचा भाईचा थरार: तरुणावर कोयत्याने हल्ला, जीव घेण्याचा प्रयत्न

पिंपरी: आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मी फुलेनगरचा भाई, माझ्याशी पंगा का घेतला असे म्हणत तिघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) कुणाल भगवान गवारगुर (वय २०, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी), अजय नितीन शेजोळ (वय २२, रा. कात्रज), गौरव शेषराव शेजोळ (वय २३, रा. कात्रज) यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रफुल गौतम जाधव (वय २५, रा. भिमक्रांती गल्ली, महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एमआयडीसी भोसरीमधील जीआयसी कंपनीजवळील सचिन कॅन्टीनसमोर सोमवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी कुणाल गवारगुर यांच्यात रविवारी भांडण झाले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी फिर्यादी हे त्यांचा मित्र समाधान वानखेडे याच्यासह पायी चालत कामासाठी जात होते. त्यावेळी कुणाल गवारगुर हा पाठीमागून आला. अजय शेजोळ याने फिर्यादी यांना पकडून ठेवले. कुणाल याने कोयत्याने फिर्यादीचे पाठीमागून डोक्यात, पाठीवर व खांद्यावर वार केले. गौरव शेजोळ याने लोखंडी रॉड डोक्यात मारुन जखमी केले. कुणाल याने हातातील कोयता हवेत फिरवून मी फुलेनगरचा भाई आहे, तु मला ओळखत नाही का?, तू माझ्याशी पंगा का घेतला ? तुला आता जिवंत सोडणार नाही़ तुला वाचवायला कोणी आल्यास त्यालाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे तेथे जमलेले लोक पळून गेले. फिर्यादी यांच्यावर उपचार करण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.