राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन;
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ग्राहकांसाठी विशेष प्रदर्शन

पुणे: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या योजनांचे व तक्रार निवारण प्रक्रियेचे माहितीपूर्ण प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ग्राहकांमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा, वजन आणि मापामध्ये होणाऱ्या फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष संदेश देण्यात येणार आहेत.
याशिवाय, ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याबाबत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयांमार्फत ग्राहक संरक्षण व संवर्धनावर भर देण्यात येईल, अशी माहिती सुधळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नागरिकांनी या उपक्रमांना उपस्थित राहून माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.