पुणे : पूरस्थिती हाताळण्यात अपयश आल्यामुळे मनपा आयुक्तांची कठोर कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उप आयुक्तांची बदली

पुण्यातील पूर परिस्थिती हाताळण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले असून, परिमंडळ तीनचे उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त खलाटे यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित ठेवण्यात आले आहे. उपायुक्त संजय शिंदे यांची बदली झाली असली तरी त्यांना नव्या पदाची जबाबदारी अद्याप देण्यात आलेली नाही.
पूरग्रस्त सिंहगड रोड परिसरात कर्तव्यात कसूर ठेवल्यामुळे ही कारवाई झाली आहे. पूरग्रस्तांना आवश्यक सुविधा पुरवण्यात अपयश आल्याचा आरोप यावर करण्यात आला आहे. गुरुवारी मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे मुठा नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांचा आरोप आहे की, या परिस्थितीसाठी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फटका बसला. पुराचे पाणी सोसायट्या, घरे, दुकाने, बाजारपेठा, आणि पार्किंगमध्ये शिरले होते.
पूर ओसरल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मदत पुरवण्यात अपयश आल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी विठ्ठलनगर परिसरात पाहणी केली असता, पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ, कचरा आणि अस्वच्छता असल्याचे आढळून आले. सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यांचे कर्तव्य पालन करण्यात आलेले अपयश पाहता, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.