महाशिवरात्रीनिमित्त पुणे वाहतुकीत बदल! जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे: महाशिवरात्री निमित्त पुणे शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.
हे बदल २६ फेब्रुवारी २०२५ रोजी लागू असतील.
वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पुण्यातील पुण्येश्वर रस्ता ते अगरवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहर वाहतूक शाखेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी कुंभारवेस चौक -गाडगीळ पुतळा चौक- जिजामाता चौक – गणेश रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
फडके हौद चौकातून कुंभारवेस चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जिजामाता चौक- फुटका बुरूज – बाजीराव रस्ता- गाडगीळ पुतळा मार्गे इच्छित स्थळी जावे.
सूर्या हॉस्पिटलकडून पवळे चौकातून अगरवाल रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जिजामाता चौकातून डावीकडून गणेश रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
कमला नेहरू रुग्णालयाकडून अगरवाल रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना दारूवाला पूल -देवजीबाबा चौक -फडके हौद चौकमार्गे पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
– पुणे पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीतील बदलांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
– भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
– वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करावे.
– कोणत्याही अडथळ्यांना सामोरे जावे लागल्यास, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.