खडकीतील पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला १० तासांत अटक; गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई

0
IMG_20261031_222131

सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध; १९ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
पुणे : खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने अवघ्या दहा तासांच्या आत शोधून ताब्यात घेतले. इम्रान रईस शेख (वय १९, रा. पाथरकर चाळ, खडकी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा समांतर तपास करून आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश युनिट-४ ला दिले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लाल रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेला, अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील एक तरुण गुन्हा करताना दिसून आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांकडे चौकशी तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी पाथरकर चाळ परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, सहायक पोलीस फौजदार एकनाथ जोशी, यास्मीन सय्यद, पोलीस हवालदार जहागीर पठाण, विशाल इथापे, अमजद शेख, तुषार खराडे, शशांक डोंगरे, सुभाष आव्हाड, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे आणि वैभव रणपिसे यांच्या पथकाने केली.

Spread the love

Leave a Reply

You may have missed