वारजे हायवे चौकात ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांची गैरसोय
Oplus_16908288
एनडीए रोडवरील मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या कॉर्नरवर मैला सांडपाणी; वाहतूक पोलिसांनाही त्रास.
पुणे | दि. २६ ऑक्टोबर २०२६
वारजे : एनडीए रोडवरील वारजे हायवे चौकात मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या कॉर्नरवरील ड्रेनेज चेंबरमधून मैला व सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात या परिसरातील नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ वाढली असताना रस्त्यावर सांडपाणी पसरल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वारजे हायवे चौकातून दररोज मोठ्या संख्येने वाहने आणि पादचारी ये-जा करतात. सध्या सणासुदीच्या निमित्ताने नागरिकांची वर्दळ वाढली असून, खरेदीसाठी तसेच अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वाहनांच्या ये-जा करण्यामुळे रस्त्यावरील सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणाच्या समोरच वारजे वाहतूक शाखा आहे. वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी परिसरात उभे राहून वाहतुकीचे नियमन करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा त्रास त्यांनाही सहन करावा लागत आहे.
ड्रेनेज चेंबरमधून मैला व सांडपाणी रस्त्यावर येण्यामागे नेमके काय कारण आहे, याची तपासणी होणे आवश्यक आहे. ड्रेनेज वाहिन्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल केली जात असल्यास अशा समस्या का उद्भवतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन ड्रेनेज चेंबरची तपासणी करावी, सांडपाण्याचा प्रवाह थांबवावा आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना अस्वच्छ परिस्थितीतून प्रवास करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.