Oplus_16908288
वारजे,पुणे,दि १०जुलै: वारजे परिसरातील रामनगर-खान वस्ती कॅनॉल रोडवरील निळं वादळ चौक ते खान वस्ती कॉर्नर हा रस्ता सध्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. एका बाजूला मोठमोठे खड्डे, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे मैलापाणी यामुळे नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असून संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या मार्गावरील ड्रेनेज चेंबर्स तुंबल्याने मैलापाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. खड्ड्यांमध्ये साचलेले सांडपाणी वाहनांच्या चाकांमुळे नागरिकांच्या अंगावर उडत असून परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, हा रस्ता परिसरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, रिक्षा, बस तसेच जड वाहनांची वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामध्ये साचलेले ड्रेनेजचे मैलापाणी यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, जुन्या मैलापाणी वाहिनीची दुरवस्था झाल्याने अवघ्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी नवीन मुख्य मैलापाणी वाहिनी टाकण्यात आली होती. मात्र, इतक्या कमी कालावधीत पुन्हा रस्त्यावर मैलापाणी वाहू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नवीन वाहिनीशी जुन्या ड्रेनेज लाईन्स योग्य पद्धतीने जोडण्यात आल्या होत्या का? कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत
.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली असतानाही रस्त्यावर मैलापाणी वाहत असेल, तर संबंधित कामाची गुणवत्ता आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली असतानाही रस्त्यावर मैलापाणी वाहत असेल, तर संबंधित कामाची गुणवत्ता आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसेच रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका पथ विभाग आणि मलनिस्सारण विभाग कर्मचारी, अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करावी, रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच वर्षभरापूर्वी झालेल्या नवीन मलनिस्सारण वाहिनीच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४