मित्राच्या खुनानंतर आरोपीला अवघ्या ६ तासांत बेड्या; वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0

पुणे, ता. ४ : वाघोली परिसरातील मांजरी खुर्द येथे मित्राचा लोखंडी हातोडा आणि लोखंडी पाईपने…

Spread the love
IMG-20260704-WA0027

पुणे, ता. ४ : वाघोली परिसरातील मांजरी खुर्द येथे मित्राचा लोखंडी हातोडा आणि लोखंडी पाईपने निर्घृण खून करून फरार झालेल्या पश्चिम बंगालमधील आरोपीला वाघोली पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या सहा तासांत जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण आणि वेगवान तपासाच्या जोरावर सातारा येथून आरोपीला ताब्यात घेत ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज अमृत साय (वय ३५) आणि मृत शिवशंकर मोहनमाड सिंह (वय ४७) हे दोघेही मांजरी खुर्द येथील एका सेंट्रिंग साईटवर मिस्त्री म्हणून काम करत होते. ते राहत असलेल्या फार्महाऊसमध्ये दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपीने लोखंडी हातोडा आणि पडदे बसविण्याच्या लोखंडी पाईपने शिवशंकर सिंह यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि कपाळावर वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर आरोपी हा पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. त्यानंतर तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप मोटे तसेच पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर आणि दीपक कोकरे यांनी सातारा येथील विविध बांधकाम साईटची पडताळणी केली.

अखेर आदर्शदीपनगर (जि. सातारा) येथील एका बांधकाम साईटवर आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शहदेव हवाले करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केली.

Spread the love

Leave a Reply

You may have missed