दुधनी: पवित्र रमजान निमित्त लोडशेडिंगच्या वेळेत बदल करा; दुधनी महावितरणला उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार यांच्या नेतृत्वात निवेदन
दुधनी (प्रतिनिधी): महेदी जिडगे
पवित्र रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, या काळात मुस्लिम बांधवांना पहाटेच्या वेळी नमाज आणि इतर धार्मिक विधींसाठी विजेची नितांत गरज भासते. ही अडचण लक्षात घेऊन दुधनी शहर व परिसरातील लोडशेडिंगच्या वेळेत बदल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन दुधनी नगरपरिषेदेचे उपनगराध्यक्ष तथा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जिलानी नाकेदार यांच्या नेतृत्वात महावितरण प्रशासनाला देण्यात आले.
हे निवेदन महावितरणच्या दुधनी सब-स्टेशन येथील ऑपरेटर संतोष कोळी आणि विद्युत सहाय्यक इरफान चौधरी यांनी स्वीकारले.
नमाजच्या वेळेत वीज खंडित होत असल्याने अडचण:
सध्या महावितरणकडून दुधनी परिसरात पहाटे ०६:०० ते ०८:३० या वेळेत लोडशेडिंग केले जात आहे. मात्र, नेमक्या याच वेळेत रमजान निमित्त मुस्लिम समाजबांधव नमाज अदा करत असतात. ऐन प्रार्थनेच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून ही वेळ बदलून सकाळी ०७:०० ते ०९:३० अशी करावी, अशी मागणी जामे मस्जिद पंच कमिटी व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती:
यावेळी उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार यांच्यासोबत गुलाब रेऊर, नजीम बाळुर्गी, गौस शेखजी, समीर जिडगे, इस्माईल गुलबर्गा, सदाम नदाफ, असलम खाटीक आणि अयूब बांगी यांच्यासह जामे मस्जिद पंच कमिटीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ लोडशेडिंगच्या वेळेत बदल करावा, जेणेकरून रमजानच्या काळात भाविकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.