पेट्रोल पंप व्यवहारावरून पूना क्लब संचालिकेला धमकी; भाजप प्रवक्त्यासह तिघांवर गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल; आरोप फेटाळत अली दारुवाला यांचे स्पष्टीकरण

0
IMG_20260207_101413.jpg

पुणे, प्रतिनिधी: लष्कर भागातील पूना क्लबच्या संचालिकेला पेट्रोल पंपाच्या व्यवहारासाठी दबाव आणून धमकावल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी दारुवाला यांच्यासह तिघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून त्या पूना क्लबच्या संचालिका आहेत. त्या शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी संबंधित महिला क्लबमधील जलतरण तलावाजवळील पार्किंगमधून मोटार घेऊन घरी निघाल्या असताना दारुवाला हे त्यांच्या दोन साथीदारांसह तेथे आले. त्यांनी महिलेच्या मोटारीजवळ आपली मोटार उभी केली आणि ‘गोल्व्हा’ नावाच्या व्यक्तीसोबत झालेला पेट्रोल पंपाचा व्यवहार तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत दबाव टाकला व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सुरुवातीला हा गुन्हा बंडगार्डन पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. घटनास्थळाच्या कार्यक्षेत्रानुसार तो नंतर कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ तपास करत आहेत.

दरम्यान, अली दारुवाला यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “तक्रारदार महिलेशी माझा कोणताही वाद नाही. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पदाधिकारी म्हणून मी त्यांना व्यवहार पूर्ण करण्याबाबत सांगत होतो. संबंधित व्यवहारात मी मध्यस्थ म्हणून होतो. आमच्यातील वाद मिटला आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Spread the love

Leave a Reply

You may have missed