दुधनीत बारावीच्या विद्यार्थ्यांना यशाची वाट दाखवणारे अभियान; शिक्षणातून परिवर्तनाचा जन्मभूमी फाउंडेशनचा प्रयत्न
दुधनी : ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने जन्मभूमी फाउंडेशन, दुधनी यांच्या वतीने ‘यशस्वी भव’ हे विशेष मार्गदर्शन अभियान श्री गुरुशांत लिंगेश्वर जुनियर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडले.

या मार्गदर्शन सत्रात विविध विषयतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. बसवराज बंद्राड सर यांनी परीक्षेपूर्व तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि विषयांची सखोल उजळणी कशी करावी यावर मार्गदर्शन केले. विज्ञान शिक्षक सुशांत गद्दी सर यांनी विज्ञान विषयातील तांत्रिक तयारी, उत्तर लिहिताना आकृत्यांचे महत्त्व तसेच परीक्षेत वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, याबाबत उपयुक्त टिप्स दिल्या. तर शंकर देसाई सर यांनी उत्तरपत्रिका लेखनाची योग्य पद्धत, गुण वाढवण्यासाठी आवश्यक बाबी आणि कठीण प्रश्नांना आत्मविश्वासाने कसे सामोरे जायचे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
विरक्त मठाचे डॉ. शांतलींगेश्वर महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने आयोजित या कार्यक्रमास जन्मभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा झळकी, उपाध्यक्ष महीदीमीयाँ जिडगे, शिवा हौदे आणि अनंत जेवरगी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा व शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याचा जन्मभूमी फाउंडेशनचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आणि कौतुकास्पद ठरत आहे.