पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनय पाटणकर यांची बदली; नियंत्रण कक्षात तात्पुरती नेमणूक

पुणे – कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय गुलाबराव पाटणकर यांची बदली करण्यात आली असून त्यांची तात्पुरती नेमणूक पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ही बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली असून ती पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्वरूपात राहणार आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम २२ नुसार आणि पुणे शहर पोलीस आस्थापना मंडळाच्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश देताना नमूद केले की, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन पदावर रुजू होऊन कार्यभार स्वीकारावा आणि त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा.
पाटणकर यांच्या बदलीमागील कारणे स्पष्ट करण्यात आली नसली, तरी ही कारवाई पूर्णतः प्रशासकीय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.