पुणे: पोलिसांचा धाडसी छापा; हडपसरमध्ये बेकायदा जुगाराचा पर्दाफाश; आठजणांना अटक, जुगार साहित्य जप्त
पुणे: हडपसर येथील डांगमाळ आळीतील एका घरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचला हडपसर भागात पत्यांवर पैसे लावून जुगार खेळण्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकत कारवाई केली.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विकास पांडुरंग हिंगणे, संतोष जयसिंग देशमुख, अशोक करंजीकर, कुमार यल्लप्पा अलकुंटे, विजय दत्तात्रय तुपे यांचा समावेश आहे. हवालदार गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील जुगार अड्डे आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.