पुण्यात ५०० रुपयांच्या मुद्रांकाची हजारात विक्री: काळाबाजाराचा कहर; कोषागारात मनुष्यबळाचा तुटवडा की प्रशासनाचा हलगर्जीपणा?

stamp-telagi-abd-crime-jalana_2023121145708.png

पुणे: गेल्या दोन महिन्यांपासून पुणे जिल्हा मुद्रांक कोषागारामधून मुद्रांक वितरकांना आवश्यक त्या प्रमाणात मुद्रांक उपलब्ध होत नसल्याने शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोषागारात कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शिक्के न मारता पडून असून, त्याचा फटका शासनाच्या महसुलालाही बसत आहे.

शासनाचा महसूल बुडतोय, नागरिकांचे हाल
दररोज पुण्यातून करोडो रुपयांच्या मुद्रांकाची विक्री होत असून, त्यातून शासनाला मोठा महसूल मिळतो. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसा पुरवठा न झाल्याने ही महसूल प्रणाली ठप्प झाली आहे. नागरिकांची कामे खोळंबत असून, मुद्रांक तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

शंभर रुपये मुद्रांक बंदचा फटका
राज्य शासनाने १५ ऑक्टोबर रोजी १०० रुपयांच्या मुद्रांकाचे वितरण थांबवल्यामुळे वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त दबाव आला आहे. नागरिकांना आता १०० रुपयांच्या ऐवजी ५०० रुपयांचे मुद्रांक खरेदी करावे लागत आहेत. परिणामी, तुटवडा वाढला असून वितरकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

कोषागारात करोडोंचे मुद्रांक पडून, वितरण ठप्प
पुणे कोषागारात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक उपलब्ध असतानाही त्यांचे वितरण होत नसल्याचे समोर आले आहे. कोषागार कार्यालयात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मुद्रांकांवर शिक्के न मारल्याने त्यांचा साठा निर्माण झाल्याचे काही वितरकांनी सांगितले. यामुळे नागरिकांचे हाल तर होतच आहेत, पण शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे.

तुटवड्यामुळे वाढले दर
तुटवड्यामुळे मुद्रांकाचा काळाबाजार सुरू असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे. काही ठिकाणी ५०० रुपयांचा मुद्रांक १,००० रुपयांना विकल्याचे प्रकारही समोर आले आहेत. निवडणूक काळात याचा सर्वाधिक फटका उमेदवारांना बसल्याची चर्चा आहे.

Spread the love

You may have missed