पुणे: राहुल गांधी यांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचे आंदोलन
पुणे, १९ सप्टेंबर २०२४: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री. राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधार्थ आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे श्री. संजय गायकवाड आणि भाजपा नेते श्री. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध बेताल वक्तव्ये केली होती, ज्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
हे आंदोलन पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये आमदार श्री. रवींद्र धंगेकर, श्री. अभय छाजेड, श्री. बाळासाहेब शिवरकर, श्री. मोहन जोशी, श्री. सुजित यादव, सौ. संगीता तिवारी यांच्यासह इतर प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी विविध घोषणांनी वातावरण गजबजून सोडले. “या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय” आणि “फडणवीस च्या बैलाला हो, संजय गायकवाड च्या बैलाला हो” अशा घोषणांनी आंदोलकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. संजय गायकवाड व अनिल बोंडे यांच्या वक्तव्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले.
आंदोलन दरम्यान, या अपमानास्पद वक्तव्यांमुळे संबंधित नेत्यांवर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी पोस्टरवर जाहीर निषेध नोंदवून सुमारे १ वाजता शांततेत आंदोलन संपवले. आंदोलनात सुमारे ३५ ते ४० महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.